[Hindi Version] [English Version]
परमात्मा असीमित प्रकाशाचा स्रोत आहे, ज्याचा ना आरंभ आहे ना अंत. सर्वकाही परमात्म्यापासून उत्पन्न होते आणि सर्वकाही परमात्म्यात विलीन होते. सर्वकाही परमात्म्याचेच आहे.
हा अवतार या देह-मन-बुद्धी संकुलात वसलेल्या आत्म्याला विनंती करतो की त्यांनी स्वतःला या देह-मन-बुद्धीपुरते मर्यादित न ठेवता, ते असीम आहे हे जाणावे. अज्ञानातून उठून, मायाच्या भ्रमाचा नाश करावा. हे जग मिथ्या आहे, याचा अर्थ ते वास्तविक जे आहे त्यापेक्षा ते वेगळे दिसते.
हे सत्य जाणून घ्या: आपणच ब्रह्म म्हणजेच परमात्मा आहात. आपणच या मायाचे निर्माता आहात. आपले खरे स्वरूप जाणून घ्या. आपले खरे स्वरूप जाणताच हे स्वच्छ पाण्यासारखे स्पष्ट होईल की ह्या माया जगतातील सर्व समस्या आणि दुःखे अगदी शुल्लक आणि तुच्छ आहेत.
कोणतेही कर्म तुम्हाला बांधू शकत नाही. ना पाप ना पुण्य तुम्हाला बांधू शकते. आपण स्वतःमध्येच पूर्ण आहात आणि आपण स्वनिर्मित सृष्टीचा अनुभव घेण्यासाठी हे शरीर-मन-बुद्धी निवडले आहे.
त्याचप्रमाणे, आपण आपल्या सृष्टीचा अनुभव घेण्यासाठी असंख्य विविध रूपे घेतली आहेत. म्हणून, कशाचीही भीती बाळगू नका, कारण याचा अर्थ आपल्या स्वतःच्या निर्मितीची भीती बाळगणे असा होईल.
पूर्ण असल्यामुळे आपण संतुष्ट आणि इच्छारहित आहात. सर्वकाही आपल्या अधीन आहे, म्हणून स्वतःला मर्यादित करू नका. सुख, निराशा, राग, द्वेष आणि दुःख यांचा काहीही अर्थ नाही कारण प्रत्येक ठिकाणी फक्त आपणच आहात. या अवताराच्या आत आणि बाहेर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अलिप्तपणे निरीक्षण करा, त्यांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका.
इच्छामुक्ती हा जन्ममृत्यूच्या अविरत चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.
हे शरीर, ज्याला अवतार म्हणतात, एक प्रगत स्वयंचलित वाहनासारखे आहे ज्यामध्ये आपण गंतव्य ठरवले आहे, आणि वाहन स्वतः त्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. तथापि, अपुऱ्या ज्ञानामुळे वाहनाने फार लांबचा मार्ग धरला तर वाहनाचा मालक उशिरा गंतव्य स्थानी पोहोचतो. म्हणून, गंतव्य स्थानावर वेळेत पोहोचण्यासाठी, जेव्हा स्वयंचलित वाहन मार्गापासून भरकटते तेव्हा ज्ञानी व्यक्तीने वाहनाचे नियंत्रण सांभाळावे. त्याचप्रमाणे, हे आत्मा, हे शरीर आपले वाहन आहे. हे शरीर-मन-बुद्धी, ज्याला अवतार म्हणतात, वास्तविकता नाही. हे मायेच्या भ्रमातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही वापरत असलेले नश्वर साधन आहे. जेव्हा केव्हा हा अवतार तुम्ही ठरवलेल्या मार्गापासून भटकतो किंवा तुमच्या मुक्तीच्या मार्गापासून दूर जातो तेव्हा तुम्ही या अवताराचे नियंत्रण सांभाळले पाहिजे.
हे आत्मा, मुक्तपणे व्यक्त व्हा आणि स्वतःच्या लीलेचा आनंद घ्या!
हे आत्मा, कृपया जाणून घ्या की या अवताराच्या जागृत आणि स्वप्न स्थितीत जे काही पाहिले जाते ते केवळ मायाचा भ्रम आहे. म्हणून या अवताराच्या डोळ्यांना आणि मनाला शक्ती द्या जेणेकरून तो प्रत्येकाला आदर आणि पूजनीय दृष्टिकोनातून पाहू शकेल, म्हणजेच प्रत्येक ठिकाणी परमात्मा, अर्थात तुम्हाला पाहू शकेल, अशाप्रकारे एकत्वाची दृष्टि प्रदान करा.
हे आत्मा, कृपया या अवताराला आशीर्वाद द्या जेणेकरून तो समजू शकेल की प्रत्येकजण परमात्म्याने, म्हणजेच तुम्ही, दिलेली कर्मे करत आहेत. जरी इतरजण कर्मांचे कर्ते भासत असले तरी सत्य हे आहे की ते केवळ त्या कर्मांचे माध्यम आहेत. म्हणून, या अवताराने (मनाने) इतरांच्या कर्मांनी दुखी होता कामा नये. उलट, अवताराने क्षमायोग्य परिस्थितीत क्षमा करावी आणि अक्षम्य अन्यायाशी लढावे, कारण हेच अवताराचे कर्तव्य आहे. लढा हा अन्यायकारक कर्मांशी असावा, व्यक्तीशी नाही. अवताराने हे सत्य लक्षात ठेवावे की ते देखील स्वतः केवळ कर्मांचे माध्यम आहे, कर्ता नव्हे.
हे आत्मा, कृपया कोणत्याही परिस्थितींना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका कारण भूतकाळात जे काही झाले आहे, जे वर्तमानात घडत आहे आणि भविष्यात जे काही होईल ते सर्व तुमचीच लीला आणि रचना आहे.
मुक्तीसाठी कोणत्याही प्रकारची इच्छा नसावी आणि अविरत कर्म करत राहावे.
जेव्हा शरीर, बुद्धी आणि मनाच्या बाहेर व आतमध्ये होणाऱ्या सर्व घटनांमध्ये आंतरिक शांती अढळ राहते, तेव्हा मुक्तीचा मार्ग सुकर होतो.
हे आत्मा, कृपया मनाला सर्व परिस्थितीत शांत राहण्याचा आशीर्वाद द्या. जर इतरांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा मनाच्या शांततेवर प्रभाव पडत असेल तर ह्याचा अर्थ आहे मनःशांतीचे नियंत्रण मनाकडे नसून इतरांवर सोपविले आहे.
मनाला जाणीव करून द्या की मनःशांतीचे नियंत्रण आणि जबाबदारी इतरांना द्यायची नसते; मनःशांतीचे नियंत्रक स्वतः मनच असले पाहिजे.
मन शांत ठेवणे म्हणजे नपुंसकता नव्हे, कर्मे ही शांत मनाने केली पाहिजेत ह्याची जाणीव मनाला करून द्या.
शांत मन आत्म्याला त्याच्या गंतव्यस्थानावर जलद पोहोचण्यास मदत करते तर चंचल मन आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गात नवनवीन अडथळे निर्माण करते.
हे आत्मा, कृपया मनाला लोकतृष्णा, धनतृष्णा आणि संततिसुखाची तृष्णा यांपासून मुक्त करा.
लोकतृष्णा म्हणजे लोकांच्या कडून मिळणाऱ्या स्तुती, आदर, प्रेम, मान आणि लक्ष यांचे आकर्षण.
धनतृष्णा म्हणजे धनप्राप्तीची तीव्र इच्छा किंवा संपत्ती मिळविण्याची लालसा.
संततिसुखाची तृष्णा म्हणजे संतानाच्या किंवा संतानाकडून आनंदाची तीव्र इच्छा.
हे आत्मा, तुम्ही या अवतारासाठी देव आहात आणि तो आपल्याला कर्मांच्या माध्यमातून पुजतो. हा अवतार तुम्हाला बांधील आहे, पण तुम्ही त्याच्याशी बांधील नाही. या अवताराला परमात्म्याला म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे शरण जाण्याचा आशीर्वाद द्या.
हे आत्मा, कृपया या शरीर, मन आणि बुद्धीला इन्द्रियसुख, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आळस, भय आणि ईर्ष्या यांपासून वाचवा. हे आत्मा, कृपया या शरीर, बुद्धी आणि मनाला लक्ष्य निर्धारित करण्यासाठी आणि निर्धारित लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आशीर्वाद द्या. कृपया त्याला एकाग्रता आणि सर्वोत्तम स्मरणशक्तीचा आशीर्वाद द्या. त्याला सर्व भूमिका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सक्षम करा. त्याला अपेक्षारहित होऊन कर्म करण्याचा आशीर्वाद द्या.
कर्मे एकत्वाच्या दृष्टिकोनातून केली जावीत.
कर्मे आनंदाने (म्हणजे चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून आणि आनंदी मनाने) केली जावीत.
कर्मे सच्च्या हेतूने केली जावीत.
कर्मांमध्ये सत्याचे पालन केले जावे.
कर्मांमध्ये न्यायाची भावना असावी.
कर्मे शांततापूर्वक केली जावीत.
कर्मे समाधानी भाव ठेवून करावी.
कर्मांमध्ये शिस्त असावी.
कर्मे स्पष्ट विचारांनी केली जावीत.
कर्मांमध्ये विनम्रता असावी.
कर्मांमध्ये क्रियाशीलता असावी.
कर्मांमध्ये प्रयत्न असावा.
कर्मांमध्ये धैर्य असावे.
कर्मांमध्ये उदारता असावी.
कर्मांमध्ये आदर असावा.
कर्मांमध्ये कृतज्ञता असावी.
हे आत्मा, कृपया या शरीर, बुद्धी आणि मनाला पूर्णतः निरोगी बनवा. हे आत्मा, कृपया या अवताराला योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक ओळखण्याचा आशीर्वाद द्या. अवताराला योग्य दिशेकडे मार्गदर्शन करा!
हे आत्मा, कृपया या अवताराला आशीर्वाद द्या जेणेकरून जेव्हा तो ‘मी’ म्हणेल तेव्हा त्याला समजेल की ‘मी’ हा आत्मा – परमात्मा आहे. ‘मी’ ह्या शब्दाला दुसरा अर्थ नाही. म्हणून बुद्धीने निर्माण केलेली ‘मी’ ही भावना भ्रम आहे आणि त्या खोटा अहंकाराचा त्वरित त्याग केला पाहिजे.
हे आत्मा, कृपया या अवताराच्या कर्मांमुळे किंवा विश्वातील कोणत्याही प्राण्यांच्या कर्मांमुळे दुखी झालेल्या आणि अज्ञानामुळे मायेच्या विळख्यात अडकलेल्या सर्व आत्म्यांपर्यंत या अवताराची माफी पोहोचवा. हा अवतार त्यांची माफी मागतो. त्यांनी पांघरलेले अविद्येचे पांघरूण काढून त्यांच्या शांतीसाठी व मुक्तीसाठी प्रार्थना करतो.
हे आत्मा, म्हणजेच परमात्मा, कृपया या बुद्धी आणि मनाला कृतज्ञता, विनम्रता आणि इतरांप्रती आदराने भरून टाका जेणेकरून विश्व आणि त्याचे सर्व रहिवासी यांच्यात एकरूपता निर्माण होईल. हे आत्मा, कृपया या अवताराला आशीर्वाद द्या जेणेकरून निःस्वार्थपणे इतरांची मदत करू शकेल.
हे आत्मा, या अवताराला आशीर्वाद द्या जेणेकरून मन इतरांच्या आनंदात आणि यशात खरा आनंद अनुभवू शकेल.
हे आत्मा, या अवताराला आशीर्वाद द्या जेणेकरून तो सुख आणि दुःखात समभाव राखू शकेल, भावना नियंत्रित करू शकेल, बुद्धी आणि मनात निर्माण होणाऱ्या इन्द्रियसुख, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आळस, भय आणि ईर्ष्या यांसारख्या सर्व शत्रूंना पराभूत करू शकेल, एकत्वाच्या दृष्टिकोनातून सर्वत्र परमात्म्याला पाहू शकेल आणि ‘ॐ’ ह्या अक्षरावर ध्यान केंद्रित करून निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करत नित्य कर्मे करू शकेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या गंतव्यापर्यंत पोहोचू शकाल.
हे आत्मा, कृपया या अवतारावर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करत राहा आणि आपल्या प्रकाशाने अवताराला प्रकाशित करत राहा!
अहम् ब्रह्मास्मि!